श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन! मनमाडसह संपूर्ण नांदगाव, निफाड व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण…
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – श्रावण महिन्याच्या प्रारंभीच मनमाडसह संपूर्ण नांदगाव, निफाड व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या असून, तब्बल महिनाभर प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवण्याची शक्यता होती. मात्र आज झालेल्या भीज पावसामुळे जमिनीत चांगली ओल निर्माण झाली असून, पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
आज सकाळपासून सुरु असलेल्या या पावसामुळे मक्याचे, सोयाबीन व बाजरीसारख्या पिकांना विशेष फायदा होणार आहे. मक्याच्या पिकाच्या दृष्टीने तर हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरतो कारण सध्या पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे पाणलोट क्षेत्रात साठा वाढण्यास मदत होईल तसेच विहिरी, तलाव आणि नदी-नाल्यांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी आपल्या आराध्य दैवत महादेवाचे आभार मानले आहेत. श्रावणात महादेवाची कृपा लाभते आणि त्यातूनच हा पावसाचा आशीर्वाद मिळतो, असे सर्वत्र बोलले जात आहे.
आता एकच अपेक्षा, की पुढील दिवसांतही असाच समाधानकारक व संततधार पाऊस सुरू राहील, बळीराजाला भरभरून पीक पाणी घेता येईल, आणि संपूर्ण नांदगाव, चांदवड, निफाड व मनमाड परिसरातील शेतकरी सुखी होईल.