चांदवड येथे प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला…
ज्ञानेश्वर पोटे

चांदवड – विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. चांदवड येथे NH-3 महामार्गाच्या चौफुलीवर शेतकऱ्यांनी सलग दीड तास रस्तारोको करत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी सांगितले की, निवडणुकीनंतर सरकारला शेतकऱ्यांचा पूर्ण विसर पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत “सातबारा कोरा” करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारचा समाचार घेतला.
विशेष लक्ष वेधून घेतले ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधाने. आंदोलनकर्त्यांनी मंत्री कोकाटे हे विधीमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रम्मी खेळण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत त्यांच्या गळ्यात पत्त्यांच्या माळा घालून, रस्त्यावर पत्ते खेळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान ऍम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा ठेवण्यात आला होता. आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले गेले. मात्र, आंदोलन अधिक तीव्र झाल्याने पोलिसांनी प्रहार जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हलवले.
या आंदोलनात प्रहार तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण, किरण झाल्टे, शंकर झाल्टे, भागवत झाल्टे, योगेश पगार, वैभव गोजरे, मारुती गोजरे, सुरेश उशीर, समाधान बागल, रेवण गांगुर्डे, संदीप जाधव, गणेश तिडके, पिंटू तिडके, हरिभाऊ सोनवणे, विनोद शिंदे, नामदेव पवार, बापू पवार आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने लवकरात लवकर मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह मंत्रालयाच्या दिशेने धडक मोर्चा काढतील, असा इशारा प्रहार जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांनी दिला.
रास्तारोकोमुळे चांदवड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता.