निफाड निवासी नायब तहसीलदारासह एक जण एसीबीच्या जाळ्यात सापडला
मुख्य संपादक राहुल वैराळ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे चुलत आजोबा व इतर यांचे मौजे पिंपळगाव नजीकच्या गट नंबर १३/१/१ पैकी क्षेत्र ८ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्र बिनशेती करण्यासाठी केलेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रकरणातील कार्यालयीन टिप्पणीवर सही करून सदर प्रकरण तहसीलदारांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात संशयित कल्पना शशिकांत निकुंभ, (५७), व्यवसायनिवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय निफाड, जि. नाशिक यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती ३५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच कल्पना निकुंभ यांच्या सांगण्यावरून अमोल राधाकृष्ण कटारे (३८), धंदा-नोकरी, (कोतवाल) तहसील कार्यालय निफाड, जिल्हा – नाशिक यांनी प्रशासकीय कार्यालयातील पुरुष प्रसाधन गृहात ३५ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहसापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, सापळा पथक पोलीस नाईक अजय गरुड, किरण अहिरराव, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.