
लासलगाव दिनांक २० डिसेंबर राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली.
” गोपाला, गोपाला… देवकिनंदन गोपाला”
निष्पाप, निस्वार्थी, प्रेम, मायेने भरलेला वासुदेव-देवकि पुत्र श्रीकृष्ण यांचे सतत भजन म्हणत जगाला अंधश्रद्धेपासून परावृत्त राहण्याचा व शिक्षण, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावोगावी पदयात्रा करत आपल्या बोलीभाषेत किर्तन, प्रवचन करणारे श्रीसंत गाडगे महाराज यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा संदेश आपल्या किर्तनातून प्रत्येक वेळी दिला. अशा थोर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी लासलगाव महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार सर, श्री किशोर गोसावी सर, श्री सुभाष रोटे सर, कार्यक्रम अधिकारी श्री सुनील गायकर सर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
कुमारी कावेरी भोकनळ या विद्यार्थिनीने भाषणातून संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य सांगितले तसेच श्री किशोर गोसावी सर यांनी देखील विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराजांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजावे यादृष्टीने सर्व स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसराची स्वच्छता केली.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार रोशन शेळके या विद्यार्थ्याने केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीेतेसाठी रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी श्री सुनील गायकर आणि सर्व स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.