
कळवण तालुक्यातील लखाणी गावात काल मध्यरात्री बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून पाच शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक शेतकरी भाऊराव भावडू बागुल यांचे शेळ्यांचे गोठे गावाच्या बाहेर शेतात आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. शेतकऱ्यांना आवाज ऐकू आला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत बिबट्याने पाच शेळ्यांचा फडशा पाडला होता.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नामदेव खांडवी व शिपाई भोये दादा घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचे आवाहन वन विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याच्या वावराचे प्रमाण वाढले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. व शासनाकडून शेतकऱ्यांला नुकसान भरपाई द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी केली.