मोहनदरी आश्रम शाळेतील शिक्षिका रेखा गांगुर्डे या कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित
वैभव गायकवाड

अभोणा:-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत शासकीय आश्रम शाळा मोहनदरी ता.कळवण जि.नाशिक या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका रेखा नामदेव गांगुर्डे यांना 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 प्राप्त झाला.
मातृसेवा फाउंडेशन ठाणे,शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या विद्यमानाने कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात रेखा गांगुर्डे यांनी “माझा उपक्रम,माझा ध्यास,विविध उपक्रमांच्या माध्यमातून करू या आदिवासी विद्यार्थांचा विकास”या उपक्रमाचा प्रस्ताव सादर केला होता.त्यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या नवोपक्रमात जुन्या पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा देत आपल्या अंगी असलेल्या कौशल्यातून हसत खेळत चार भिंतीच्या आत शिक्षणाची मर्यादा न ठेवता मुलांना मुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी या उपक्रमातून केला आहे. तसेच आदिवासी भागात शाळा असल्याने विद्यार्थीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व विद्यार्थांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे.आदिवासी भागात वर्षानुवर्ष पोटापाण्यासाठी आदिवासी कुटुंबाचे होणारे स्थलांतर हे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खूप घातक परिणाम करत आहेत. वीटभट्टी,कोळसा भट्टी, विटा पाडणे, ऊस तोडीसाठी जेव्हा आदिवासी बांधव स्थलांतर होतो तेव्हा त्यांच्या सोबत शाळेत असणारी मुले ही स्थलांतर होत असतात.मुलांची शाळा शिकण्याची खूप इच्छा असते पण आईवडिलांच्या जीवन जगण्याच्या संघर्षात त्यांना शाळा सोडून जावं लागत.वर्षानुवर्ष आदिवासी बांधवांचे होणारे स्थलांतर हे मुलांच्या शिक्षणाच्या पथ्यावर पडत आहे.त्या मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी.शिक्षणाचे महत्त्व कळावे.खेळण्याच्या कृतीतून पुनरावृत्ती होऊन ज्ञान आकलनाची क्षमता व गतीचा विकास तसेच विद्यार्थांचा सर्वांगीण विकासास पोषक असे वातावरण निर्मिती या उपक्रमातून होते.म्हणून रेखा गांगुर्डे मॅडम यांनी रोजचा कृती आराखडा व नियोजन करून विविध उपक्रम घेत आहे.या उपक्रमामुळे आनंदी शालेय वातावरणाची निर्मिती झाली.त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्कार मिळाल्या बद्दल श्रीमती रेखा गांगुर्डे यांचा सत्कार श्री.जगन दादा जगताप, अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती मोहनदरी,श्री.संजयदादा खिल्लारी, तालुका अध्यक्ष महा. राज्य आदिवासी बचाव अभियान कळवण,शाळेचे मुख्याध्यापक श्री.अहिरे सर व शिक्षकवृंद,कर्मचारी यांनी त्यांना भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचा मानसन्मान वाढविला.