उमेदचा स्वतंत्र विभाग करा; तालुका अधिवेशनात संघटनेचे शासनाला साखडे
प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर भवर.

. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मागील २३ सप्टेबर पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरु असून दि.३ ऑक्टोबर पासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरु आहे. ८४ लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामविकास विभागांतर्गत स्वतंत्र विभाग करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता देऊन त्यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन शासन सेवेत समाविष्ट करावे तसेच सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांना गावस्तरावर काम करणाऱ्या कॅडरला शासकीय दर्जा द्यावा ही एकमेव मागणी करण्यात आलेली आहे. यामागणीच्या अनुषंगाने सर्व राज्यभर तालुका स्तरावर उमेद संघटनेच्या वतीने महाअधिवेशन तथा उमेद संघटना मागणी जनजागृती महामेळावा आयोजित करण्यात आले होते. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे संघटनेचे महिला अधिवेशन दिनांक ०४ ऑक्टोंबर २०२४ रोजी पार पडले या अधिवेशनात तब्बल तालुक्यातील ३ ते ४ हजार महिलांचा व कंत्राटी कर्मचारी यांचा सहभाग होता. प्रसंगी कार्यक्रमाला मा. खा. श्री. भास्कर भगरे साहेब व मा. आ. श्री. दिलीप काकाजी बनकर साहेब तसेच गाव स्तरावरील स्वयंसहायता समूहातील अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामसंघ व प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक प्रभावी अमलबजावणी होत असलेली लोककल्याणकारी योजना म्हणून उमेद अभियानाची ओळख आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ८४ लाख कुटुंब संघटीत झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न योजनेच्या माध्यमातून सोडवत आहेत. केंद्र सरकारचे लखपती दीदी धोरणाची अंमलबजावणी देखील राज्यात उमेद अभियानाच्या माध्यमातूनच सुरु आहे. त्यामुळे उमेद अभियानाला स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केल्यास ग्रामीण महिलांचा सर्वांगिक विकासाचे ध्येय धोरणे यामाध्यमातून राबविता येतील आणि त्यांचा विकास हा शास्वत व चिरकाल पद्धतीने करता येईल.
आज दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यभर सर्व तालुक्यांमध्ये तालुका स्तरीय अधिवेशन बोलाविण्यात आले होते.
तालुका स्तरावर झालेल्या या अधिवेशनात उपस्थित मा. आ. श्री. दिलीप काकाजी बनकर साहेब यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या प्रमाणे उमेदच्या सी.आर.पी यादेखील खूप छान प्रकारे गावात कामकाज करतात. संघटनेच्या स्वतंत्र विभाग झाल्यास महिलांना चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. उमेद महिलांच्या भावना राज्य सरकारकडे मांडू असे मत याठिकाणी त्यांनी व्यक्त केले व तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करेल असे आश्वासन मा.आमदार साहेबांनी महिलांना दिले. मा. खा. श्री. भास्कर भगरे साहेब यांनी आपली मागणी रास्त आणि योग्य असल्याचे सांगितले. करोना काळामध्ये आशा सेविका सारखेच CRP सुद्धा कामकाज करत होत्या तुमच्या अभियानाचे नाव उमेद आहे त्यामुळे तुम्ही नाउमेद होऊ नका असेही यावेळी त्यांनी महिलांना सांगितले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद अभियानातील सर्व कॅडर यांनी परिश्रम घेतले.