लासलगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. २६ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापनादिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.विलास खैरनार, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे आणि महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.उज्वला शेळके तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.विलास खैरनार यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाने राष्ट्राच्या उभारणीसाठी सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे असे विचार व्यक्त केले.
तसेच याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर हिऱ्याप्रमाणे पैलू पाडण्याचं कार्य केलं जातं तसेच रासेयो अंतर्गत विविध उपक्रम महाविद्यालयात वर्षभर राबविले जातात. यात भाग घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार, व्यक्तिमत्व विकास करावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका आरती गायकवाड हिने केले. तर आभार मनीष आहेर या स्वयंसेवकाने मानले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.