
लासलगाव, ता. २३ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या वाणिज्य मंडळाचे उद्घाटन पंजाब नॅशनल बँकेच्या लासलगाव शाखेचे मॅनेजर श्री.अक्षय कोळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी वाणिज्य विभागाचे प्रा.मनोहर मोरे, प्रा.विरेंद्र आहेर, प्रा.सृष्टी थोरात, प्रा.लखन माने आणि प्रा.सुनिल गायकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्याच्या परिचय वाणिज्य विभागाचे प्रा.मनोहर मोरे यांनी केला. प्रास्ताविकात वाणिज्य मंडळ अंतर्गत राबवत असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती स्पष्ट करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर श्री.अक्षय कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बँकिंग आणि आयबीपीएस या परीक्षेविषयी सविस्तर माहिती दिली तसेच त्यासोबत विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील एनपीए, बँक दर अशा विविध संकल्पनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वाणिज्य विभागाचे प्रा.सुनिल गायकर यांनी वाणिज्य शाखेचे महत्त्व सांगताना वाणिज्य शाखेतील विविध संधी आणि त्या संधींना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच करिअर करताना विद्यार्थ्यांनी कोणकोणती कौशल्य अवगत करणे गरजेचे आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयाचा सुसंगत असा अभ्यास करून भविष्यामध्ये चांगले उद्योजक निर्माण करण्यामध्ये हातभार लावावा तसेच भविष्यामध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना भरपूर व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत, त्या संधीचाही फायदा करून घ्यावा असे आव्हान केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन निकिता काळे आणि मानसी शेजवळ यांनी केले तर आभार गौरव पालवे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.विरेंद्र आहेर, प्रा.सृष्टी थोरात, प्रा.लखन माने यांनी विशेष परिश्रम घेतले.