राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी विधानभवन प्रांगणात….
वैभव गायकवाड

राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी विधानभवन प्रांगणात आज विविध क्षेत्रातील माता भगिनी एकत्र जमल्या होत्या. त्यांनी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचे औक्षण करत राखी बांधली तसेच घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार मानले.
अर्थसंकल्पात घेतलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा” शासन निर्णय तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या १ जुलैपासून सर्व पात्र माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयांच्या रूपाने मिळणार आहे. अडीच कोटींहून जास्त महिलांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासोबत वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणाऱ्या “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही” लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल १५ हजारावरून वाढवून ३० हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. १० हजार महिलांना पिंक ई रिक्षांची खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य करण्याचा निर्णय, तसेच ज्येष्ठ महिलांना मोफत प्रवास, ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे. या सर्व निर्णयांबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.
यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी आवर्जून उपस्थित होत्या.