नवीन सरकार येईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार, निवडणूक आयोगाकडून घोषणा.
नाशिक प्रतिनिधी

राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी सरकारने केली होती. यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया आली आहे .नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 – अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्याप पर्यंत सुरू असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथीलता देण्यात आलेली नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचार संहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे. आचार संहिता कालावधीत जर एखादे अत्यंत तातडीचे प्रकरण असल्यास आचारसंहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या 28 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकांवर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. लोकसभा निवडणूक 2014 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण 59 प्रस्तावावर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे. तरी आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले पाहिजे याची सर्व संबंधिताद्वारे दक्षता घेण्यात यावी. भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 च्या परिपत्रकांन्वे देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करून आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये काय करावे व काय नाही करावे याबाबतच्या तसेच इतर विविध विषयाबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाच्या 2 जानेवारी 2024 च्या एकूण आठ पत्रानवे स्वतंत्ररीत्या देण्यात आले आहेत .सदर सूचनाचे कटाक्षाने पालन करावे निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पाच मार्च 2024 आणि 7 मार्च 2024 या पत्राद्वारे सर्व संबंधित यंत्रणा सूचना देण्यात आलेले आहेत. नाशिक व कोकण विभागातील महाराष्ट्र विधान परिषदेतील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदर रिक्त होणाऱ्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 रोजीच्या परिपत्रकांवर निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून प्रसिद्धी पत्रक जारी केलेल्या दिवसापासून संबंधित मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत पालन करावयाच्या आदर्श आचारसंहिते बाबतच्या सविस्तर सूचना भारत निवडणूक आयोगाच्या सव्वीस डिसेंबर 2016 च्या पत्रामध्ये देण्यात आले आहेत. सदर सूचनाचे कटाक्षाने पालन करण्यात येईल याची सर्व संबंधिताद्वारे दक्षता घेण्यात यावी असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.