चोकाक येथील चालू असलेला घनकचरा प्रकल्प तात्काळ थांबवण्याचे मागणीचे निवेदन
चोकाक / वार्ताहर

चोकाक येथील गावरान गट नंबर 110 गाव तलावा मध्ये चुकीच्या जागी सुरू असलेला घनकचरा प्रकल्प तात्काळ थांबवून जागा निश्चीत कामी दोषी असणाऱ्या संबंधितावर ठोस कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चोकाक तालुका हातकणंगले या गावी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा प्रकल्प मंजूर आहे. सदर प्रकल्प ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली होत असून अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश होऊन गट क्रमांक 110 गाव तलाव मध्ये घनकचरा प्रकल्पाचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू आहे.
गायरान गट नंबर 110 मध्ये गाव तलाव असून या तलावाचा वापर टंचाईच्या काळात ग्रामस्थ जनावरांना पाणी, धुणे, बांधकामासाठी करतात. या तलावामुळे आसपासच्या विहीर व कुपनलिका यांना फायदा होतो. पंचायत समिती हातकणंगले कडून या तलावाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला आहे. ग्रामपंचायतीने गाव तलावामध्ये घनकचरा प्रकल्प उभा करून तलाव मुजविन्याच्या हेतूने सदरचे कृत्य केले आहे.यामुळे त्या ठिकाणचा पाणीसाठा पावसाळ्यात दूषित होणार असून सभोवतालच्या नागरिकांना आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याचा मोठा मानवनिर्मित धोका आहे.
या प्रकल्पासाठी जागा निश्चित कामी दोषीत असणाऱ्या सर्व घटकावर कारवाई करावी व संबंधित प्रकल्पाची चौकशी करून तात्काळ बांधकाम थांबवावे व शासनाचा पैसा व गाव तलाव याची संवर्धन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सचीन पाटील, नंदकुमार पाटील ,आनंद हलसवडे, संजय पाटील, सुरज सुतार, प्रशांत सुतार यांच्या सह्या आहेत.