के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालय काकासाहेबनगर येथे पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघांना आदरांजली
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

के. के. वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेब नगर येथे पद्मश्री, कर्मवीर काकासाहेब वाघ, यांची जयंती साजरी करण्यात आली. काकासाहेब वाघ यांच्या वाड्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. रानवड साखर कारखाना परिसरातील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काकासाहेबांच्या सामाजिक कार्याचा आढावा प्रतिष्टीत नागरिक जयवंतराव वाघ यांनी उपस्थितांपुढे मांडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलतांना कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे नातू, स्माईल व स्पिनॅच संस्थेचे सचिव, मा. श्री. अजिंक्य बाळासाहेब वाघ यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व कौटुंबिक कार्याला उजाळा देत राजकारणाला व समाजकारणाला शेतकरी, कष्टकरी, पिचलेल्या सर्वहारा वर्गाच्या बाजूने नेत, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयुष्य खर्च करणारे व अवघा तालुका, जिल्हा, व महाराष्ट्रच नव्हे तर भारताला ज्ञात झालेले काका हे खऱ्या अर्थाने कर्मवीर असल्याचे नमूद केले. तसेच मा. श्री. रमाकांत जाधव सर यांनी आपल्या मनोगतातून पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनकार्याचा आढावा विविध प्रसंगांच्या माध्यमातून व्यक्त केला. मुंबई महाराष्ट्रात असावी यासाठीच्या चळवळीतील काकासाहेबांचा सहभाग कसा मोलाचा होता हेही विषद केले. परिसाच्या सहवासात आयुष्याचं सोनं व्हावं, याप्रमाणे समाजातील शेवटच्या माणसाच्या विकासाचा विचार करणारे, युक्ती आणि कृतीत अंतर न ठेवणारे, आकाशाच्या उंचीचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर काकासाहेब वाघ असल्याचे मा श्री रमेश शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, श्री शरद कदम यांनी आपल्या मनोगतातून नेतृत्व कसे व किती खंबीर असावे हे स्पष्ट करतांना काकासाहेबांच्या आयुष्यातील विविध प्रसंग मांडत काकांच्या कार्याला अभिवादन करून त्यांचे सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील अमूल्य असे योगदान कधीही न विसरता येणारे असल्याचेही विषद केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी एल जाधव यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा देत, ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्यातील काकांचे कार्य विषद केले.
याप्रसंगी रानवड पंचक्रोशीतील विविध मान्यवर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.