नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू
मुख्य संपादक राहुल वैराळ

संक्रातीनिमित्ताने ठिकठिकाणी पतंग उडवणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र या पतंग उडविण्यासाठी नायलॉनचा मांजा सर्रास वापरला जात असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत अनेक जण या माजांमुळे जबर जखमी झाले आहेत.
आता तर या मांजाने एकाच जीव घेतला आहे. ही घटना नाशिकमधून समोर आली आहे.
नाशिकमध्ये एका 23 वर्षीय तरुण सोनू किसन धोत्रे याचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झाला आहे. हा तरुण पाथर्डी फाटा परिसरातील असल्याचं समजतं. तरुणाला आधी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. यातच त्याचा मृत्यू झाला.
तीन महिन्यांनी 13 मे रोजी सोनूचं लग्न होतं. ड्रायव्हर व्यवसायाकरिता तो गुजरातमधील वलसाड येथे स्थायिक झाला होता. आज संक्रांतीला सणासुधीसाठी तो नाशिकला आपल्या घरी देवळाली कॅम्प येथे आला होता. त्यांच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे तो घराचा सांभाळ करीत होता. पाहता पाहता आईच्या डोळ्यांदेखत सोनूचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
नाशिकच्या येवल्यात पतंगोत्सवाची धूम सुरू असताना या उत्सवाला काल पुन्हा एकदा गालबोट लागले आहे. पारेगाव रोडने बाईकवरून घरी जाणाऱ्या दत्तू जेजुरकर या तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजाने गंभीर जखम झाली असून त्याला एकूण 45 टाके टाकण्यात आले आहे. येवल्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. येवल्यात वारंवार नायलॉन मांजाने नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत असताना येवल्यात नायलॉन मांजा सर्रासपणे वापर होत पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाने नायलॉन मांजाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.