
मनमाड – मनमाड शहरातील बस स्थानकासमोर असलेले एका गॅरेज समोर एक सत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना मनमाड शहरात घडली असून मच्छिंद्र सदाशिव पवार नाव आहे. मनमाड शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मनमाड पोलीस करत आहेत.
याबाबत अधिकृत सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मनमाड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील एका गॅरेज समोर एक ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर घटनास्थळावर मृतदेहाची पाहणी केली. सदर मृतदेह प्राथमिक अंदाजानुसार ७० ते ७५ वर्षीय म्हाताऱ्या व्यक्तीचा असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आला आणि बाजूलाच एका पेवर ब्लॉकचा दगड पण मिळून आला असून मनमाड पोलिसांनी सदर घटनास्थळावरील पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटली असून सदर व्यक्तीचे नाव मच्छिंद्र सदाशिव पवार असे असून ती व्यक्ती संभाजीनगर येथील रहिवासी होती. मनमाड येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर ७० ते ७५ वर्षीय वृद्ध इसमाच्या खुनाच्या घटनेने मनमाड शहरात एकच खळबळ उडाली होती. मनमाड शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन व मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ व इतर टीम करत आहे.