
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या “वाणिज्य शाखेतील करीयरच्या संधी” या विषयावर इयत्ता अकरावी व बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना ‘सीए क्षेत्रातील करिअर’ या विषयावर प्रा.सृष्टी थोरात व प्रा.सौरभ तीपायले यांनी मार्गदर्शन केले. अकरावी बारावी वाणिज्य शाखेत असतानाच सीपीटी परीक्षेची तयारी कशी करावी तसेच बारावीनंतर अथवा पदवीनंतर सीए ची तयारी कशी करावी याविषयीचे विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी प्रा.किशोर गोसावी यांनी देखील विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड जोपासून अवांतर वाचनाची विद्यार्थ्यांनी सवय अंगी बाळगावी तसेच विद्यार्थ्यांनी लिहीते व्हावे असे आवाहन केले. यानंतर प्रा.सुनिल गायकर यांनी विद्यार्थ्यांना “बारावी नंतरच्या वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन केले. आज व्यापार व्यवसाय व उदयोग क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होत असल्याने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्वतामध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे प्रतिपादन प्रा.सुनिल गायकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी आपल्याकडे पालकच पाल्याचा निर्णय घेताना दिसतात तसेच विज्ञान शाखेला कायम वरचढ मानले जाते. परंतु आज वाणिज्य शाखेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे तसेच विज्ञान शाखेप्रमाणेच वाणिज्य शाखेतही करिअरच्या नानाविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारे क्षेत्राची निवड न करता आवडीचे क्षेत्र करिअर म्हणून निवडावे. वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा असल्यास ‘अकाउंटन्सी’ विषयात आवड असणे गरजेचे आहे. वाणिज्य शाखेत मोठ्या संधी असून सीए, सीएस, सीएमए, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, एमबीए, फायनान्स, बीबीए, बीकॉम, लॉ, बँकिंग व स्पर्धा परीक्षा असे अनेक पर्याय आहेत. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना बँकिंग आयबीपीएस राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही संधी आहेत. महाविदयालयातील जीवनातील सुवर्ण दिवसांचा उपयोग आपले जीवन घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी अधिकचे मार्गदर्शन करतांना प्रा.उज्वल शेलार म्हणाले की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध आहे, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी होण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम महत्वाचे ठरू शकतात, रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य अवगत करावी, मात्र यासाठी अभ्यासात सातत्य, ध्येय व परिश्रम महत्वाचे आहे, आदर्श माणसांची चरित्र विद्यार्थ्यांनी वाचावीत यासाठी विद्यार्थ्यांनी किमान एक तरी पुस्तक वाचावे असे आवाहन याप्रसंगी प्रा.उज्वल शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील प्रा.अश्विनी बोरसे यांनी केले तर प्रा.गणेश जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.अश्विनी बोरसे, प्रा.गणेश,जाधव, प्रा.मोहन बागल, प्रा.महेश होळकर, प्रा.नितीन शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.