आज भारताच्या ७८ वा स्वातंत्र्यदिना निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री मा. ना. दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते संपन्न.

आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, वीर माता पिता, वीर पत्नी, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी आणि माझे सर्व जिल्हावासिय बंधु भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या पालकमंत्री ना. दादाजी भुसे साहेबांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य चळवळीत बलिदान व योगदान दिलेल्या प्रत्येकाप्रती तसेच, सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांप्रती मी सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो असे यावेळी भुसे साहेबांनी संबोधित करताना म्हंटले.
आज नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले, यावेळी उपस्थितांना संबोधित करत संवाद साधला. राज्य शासनाने समाजातील सर्व घटक केंद्रित केले आहेत. त्यांच्या विकासावर भर दिला आहे. त्यापैकीच एक महिला सक्षमीकरण हे महत्त्वाकांक्षी धोरण आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून माझ्या बहिणींना महिन्याला दीड हजार रूपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेचे सात लाख १६ हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कालच लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
महिला सन्मान योजनेतून एस. टी. प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली आहे. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला सोळा ते सतरा लाख महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जवळपास दीड लाख महिलांना साडी वाटप केले आहे. तसेच गौरी गणपतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’च्या माध्यमातून जिल्ह्यासाठी ०८ लाख ३६ हजार किटची मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर महाराष्ट्र दिनापासून शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला आहे. मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलेंडरचे मोफत पुनर्भरण अशा अनेक योजनांतून माता भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर एनडीएमध्ये मुलींना संधी देण्यासाठी नाशिकमध्ये पहिले पूर्वप्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून रोजगार इच्छुकांना विद्यावेतनासह शिकाऊ उमेदवारी दिली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात जवळपास दहा हजार रिक्त पदांसाठी पाच हजारहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तसेच, गेल्या दोन वर्षात सर्व विभागांच्या अनुकंपा तत्वावरील साधारण साडेसातशे उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली आहेत.
बळीराजाचे हात बळकट करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सव्वा चार लाखहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास ८९ कोटी एवढा निधी वितरीत केलेला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकऱ्यांची ई पंचनामा पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात आली आहे. तर जवळपास ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण ४९७ कोटी ९१ लाख रूपये रक्कम डीबीटी मार्फत अपलोड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आजअखेर पावणेदोन लाखहून अधिक लाभार्थीना शंभर कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई वाटप करण्यात आलेली आहे.
येणाऱ्या काळात भारताची वाटचाल अजून तेजस्वी आणि प्रभावी असणार आहे. जगात भारताचे महत्व वाढले असून तरुण हे देशाचा कणा आहे. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!