
नाशिक – मनोज जरांगे पाटील यांनी आठ जून पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले .त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून गेले चार दिवसापासून त्यांनी काहीच खाल्ले नसल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला, परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक मध्ये सकल मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सकल मराठा समाज ,राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडे घालणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांनी जसे महाविकास आघाडीचे नेतृत्व केले, तसेच सर्वपक्षीय आमदार खासदाराचे नेतृत्व करत मराठा समाजाला न्याय देत जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबविण्यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे. आता सकल मराठा समाज नेमकी काय भूमिका मांडणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.