लासलगाव महाविद्यालयात शालेय मैदानी स्पर्धांचे उत्साहात आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, निफाड तालुका क्रीडा समिती निफाड व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य डॉ.अदिनाथ मोरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धांचे आयोजन वयोगटानुसार करण्यात आले. निफाड तालुक्यातील विविध शाळेतील १४ वर्ष आतील मुले व मुली, १७ वर्ष आतील मुले व मुली, १९ वर्ष आतील मुले व मुली या वयोगटानुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ११०० खेळाडूंनी जम्पिंग (लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी , बांबू उडी), थ्रोइंग (थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, हातोडाफेक) व रनिंग (१०० मीटर ,२०० मीटर , ४०० मीटर , ८०० मीटर, १५०० मीटर ,३ किमी धावणे व चालणे, ५ किमी धावणे व चालणे, ४ x १०० मीटर रिले, ४ x ४०० मीटर रिले, १०० व ४०० मीटर हर्डल्स) अशा विविध प्रकारच्या मैदानी स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल टाकळी, क.का.वाघ भाऊसाहेबनगर, वैनतेय विद्यालय निफाड, एन.व्ही.पी.कॉलेज लासलगाव या महाविद्यालयाच्या खेळाडूंचे स्पर्धेत वर्चस्व राहिले.
या सर्व स्पर्धांची जबाबदारी क्रीडा संचालक डॉ.नारायण जाधव यांनी पहिली. तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी निफाड तालुका क्रीडा प्रमुख प्रा.सुभाष खाटेकर, निफाड तालुका उप क्रीडा प्रमुख प्रा.गोविंद कांदळकर, लासलगाव महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.गणेश जाधव, प्रा.विलास निरभवणे, प्रा.रावसाहेब जाधव, प्रा.जितेंद्र आहिरे, प्रा.भीमराव काळे, प्रा.राजेंद्र बनसोडे, प्रा.रामेश्वर शिंदे, प्रा.अक्षय अंबेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे यांचे मार्गदर्शन लाभले.