लासलगाव महाविद्यालयात नदी संवर्धन व स्वच्छता प्रकल्प कार्यशाळा संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘नदी संवर्धन व स्वच्छता प्रकल्प अभियान कार्यशाळा’ दिनांक 5 मार्च 2024 रोजी घेण्यात झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी विभागीय समन्वयक प्रा.अशोक सोनवणे, नाशिक जिल्हा समन्वयक डॉ.गोरखनाथ पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा उदघाटन समारंभ पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना डॉ.गोरखनाथ पिंगळे यांनी नदी संवर्धन आणि स्वच्छता पुढच्या पिढीच्या दृष्टीने व संस्कृती जपण्यासाठी गरजेची आहे असे सांगितले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना प्रा.अशोक सोनवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक कशा पद्धतीने देशाच्या कामी येऊ शकतो हे गाडगेबाबांच्या कार्याचा जीवनपट स्वयंसेवकांपुढे उभा करून स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ.सोमनाथ आरोटे यांनी बाहेरील स्वच्छतेसोबत मनाची स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून स्वयंसेवकांना नदी संवर्धन आणि स्वच्छता या विषयाचे महत्त्व विशद केले. सर्व स्वयंसेवकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर विद्यार्थी स्वयंसेवकांनी शिव नदीपात्र स्वच्छता केली. यामध्ये प्लास्टिक संकलन केले. नदीपात्रातील अनावश्यक व जलप्रदूषण करणारा घनकचरा संकलित केला. तसेच नदीतील प्लास्टिक, कचरा संकलित करून श्रमदान केले. या कार्यशाळेसाठी 210 स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. मारुती कंधारे यांनी केले. सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी केले तर आभार डॉ.संजय शिंदे यांनी मानले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.उज्वला शेळके, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारोती कंधारे, प्रा.सुनिल गायकर व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.