चांदवड बाजार समितीत गायी, म्हशी व इतर पशुधन खरेदी-विक्रीचा शुभारंभ संपन्न
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड बाजार समितीचे मुख्य बाजार आवार चांदवड येथे गायी, म्हशी व इतर पशुधन खरेदी विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे संचालक मा.आ.श्री.शिरिषकुमार कोतवाल यांचे शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी खरेदी-विक्रीच्या पहिल्याच दिवशी 50 ते 60 विविध जातीच्या गायी व इतर पशुधन विक्रीस आलेले होते. त्यानुसार गायीस कमीत कमी रु.40,000/- जास्तीत जास्त 1,01,000/- पर्यंत बाजारभाव मिळाले. चांदवड तालुका हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो. निसर्गावर शेती अवलंबुन आहे. लहरी हवामानामुळे शेतक-यांना दरवर्षी तोट्यात शेती करावी लागलेली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत दुग्धव्यवसायाने शेतकरी वर्गास जगण्याचा आधार दिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गाने शेतीवर अवलंबुन न राहता जोडधंदा म्हणुन दुग्धव्यवसाय केला पाहिजे. पशुधनाची देखरेख, आरोग्याची काळजी इ. दक्षता घेतल्यास सदरचा व्यवसाय फायदेशिर आहे. त्यामुळे बाजार समितीमार्फत पशुधनाबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. सदर शुभारंभ प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, तसेच व्यापारी, शेतकरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती श्री.संजय दगुजी जाधव, उपसभापती श्री.कारभारी आहेर, संचालक मा.आ.श्री.शिरिषकुमार कोतवाल, डॉ.आत्माराम कुंभार्डे, नितीन दादा आहेर, विक्रम बाबा मार्कंड, राजेंद्र दवंडे, पंढरीनाथ खताळ, वाल्मिक वानखेडे, गणेश निंबाळकर, सुशिल पलोड, रविंद्र पवार, व्यापारी विलास पवार, विशालभाऊ, फारुख पटेल, रईश शेख, टिल्लुभाई, बब्बाभाई व डॉ.शामराव जाधव, बापु शिरसाठ तसेच दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदवड बाजार समितीत भारतातील नामवंत प्रकारच्या गायी व म्हशी एकाच छताखाली खरेदी व विक्रीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असुन त्यासाठी बाजार समितीमार्फत विविध सोई-सुविधा पुरविण्यात येत आहे. त्यात जनावरांसाठी पिण्याचे पाणी, खरेदी-विक्रीसाठी जागा इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यानुसार चांदवड येथे दर सोमवारी सकाळी 9 ते 5 या वेळेत गायी खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत. तसेच याठिकाणी गायींमधील होलस्टीन फ्रिजीयन (HF), जरशी, गावठी, गिर गाय इ. सर्व प्रकारच्या/जातींच्या गायी, म्हशी व इतर पशुधन खरेदी विक्रीस उपलब्ध होणार आहे. त्यात शेतकरी वर्गाची कोणतीही फसवणुक होणार नाही, याबाबत बाजार समितीमार्फत उचित धोरण ठरविण्यात येणार आहे. तरी शेतकरी व व्यापारी वर्गाने दर सोमवारी चांदवड बाजार समितीत पशुधन खरेदी विक्रीस आणावे, असे आवाहन सभापती श्री. संजय दगुजी जाधव, उपसभापती कारभारी आहेर व सर्व संचालक मंडळाने केले आहे.