हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे. पहिल्या टप्याचे उद्घाटन
वैभव गायकवाड

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे. पहिल्या टप्याचे उद्घाटन आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते झाले, आणि आज तिसऱ्या टप्याचे लोकार्पण होत आहे. तिसऱ्या टप्यात भरवीर ते इगतपुरी या २५ किमी अंतराचे लोकार्पण होत आहे. आतापर्यंत ६२५ किमी. रस्ता पूर्ण झाला आहे.
लोकार्पण सोहळ्या प्रसंगी मंत्री डॉ. भारतीताई पवार, मंत्री छगन भुजबळ साहेब, आ. हिरामण खोसकर, माजी आ. काशिनाथ मेंगाळ, एमएसआरडीसीचे अधिकारी कर्मचारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे राहणीमान सुधारावे याकरिता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची निर्मिती केली आहे.
समृद्धी महामार्गाशी ग्रामीण भागाचा कनेक्ट वाढून रोजगार निर्माण होणार आहे. समृद्धी महामार्ग पंतप्रधानांचे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. महामार्ग पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक-सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे नमूद करण्यास अभिमान वाटतो की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जी.डी.पी) महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे.
महाराष्ट्र हा जसा गावकुसांच्या अनवट घाटवाटांचा प्रदेश आहे. तसाच तो महानगरांच्या वेगवान महामार्गाचाही प्रदेश आहे.
राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते आणि शहरांतर्गत रस्ते असे रस्त्यांचे अखंड विणलेले जाळे आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेत आहेत.
आंतरराष्ट्रीय शहर अशी ओळख मोठ्या अभिमानाने मिरवणारे मुंबई असेल किंवा वेगाने प्रगतीच्या दिशेने झेपावणारी राज्याची उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळ, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे. राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली गेल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबीका मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक आली आहेत.
समृद्धी महामार्गावर ठराविक ठिकाणी वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स, तसेच १३८.४७ मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प देखील उभारण्यात येत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण 24 जिल्ह्यांना जोडले जात आहोत. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
पायाभूत सुविधांना एक मानवी स्पर्श देणारं सरकार सध्या राज्यात आणि देशात आहे. आता रोड कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. लवकरच हायस्पीड रेल्वे पण होणार आहे. येणाऱ्या काही महिन्यात हा महामार्ग मुंबईशी जोडला जाईल तेव्हा वाहतुकीचा भार हलका होणार आहे, आपला प्रवास सुककर होईल यात शंका नाही.