
लासलगाव – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थीनींनी मुलांना राख्या बांधून रक्षाबंधन सण महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन सणानिमित्त एक अभिनव उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आदिनाथ मोरे यांच्या प्रेरणेतून व उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार आणि प्रा.सुनील गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.
या उपक्रमातून एक सामाजिक संदेश मिळावा तसेच रक्षाबंधन या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे व बंधुभाव जोपासला जावा या उद्देशाने कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य व विज्ञान विभागात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यीनींनी शिक्षकांना आणि मुलांना याप्रसंगी राख्या बांधल्या. या उपक्रमासाठी इयत्ता बारावी वाणिज्य शाखेच्या सुहानी शुक्ला या विद्यार्थिनीने विशेष मेहनत घेतली. तसेच या उपक्रमात बारावी वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.