श्री . स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन,, प्रवचन व दर्शन सोहळा
प्रतिनिधी. श्री ज्ञानेश्वर भवर

अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन , प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन जनम संस्थानाच्या रामशेज किल्ल्याजवळील आशेवाडी येथील उत्तर महाराष्ट्र उपपीठ आश्रमात करण्यात आले आहे.श्रावण मासात हा सोहळा आल्याने या सोहळ्यास हजारो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. यामुळे उपपिठाच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
दोन दिवस असणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी नवीन साधकांना साधक दिक्षा दिली जाणार आहे. उपपीठावर बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण दिनांक २८ ऑगस्ट रोजी जगद्गुरू श्रींच्या हस्ते होणार आहे . नंतर सिद्ध पादुका असलेल्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीनंतर माऊलींच्या सिद्ध पादुकांचे विधीवत पूजन करून पादुका स्थापना करण्यात येणार आहेत. नाशिक उप पीठावर पहिल्यांदाच माऊलींच्या अमृततुल्य प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. स्वप्नातही कोणाचे वाईट चिंतू नका. तुम्ही जगा , दुसऱ्याला जगवा असे नरेंद्राचार्यजी महाराज यांचे विचार आहेत. विज्ञानाची सांगड घालून जीवन कसे जगावे यावर स्वामीजी मार्गदर्शन करणार आहेत. विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून मानवास येणाऱ्या समस्यांवर देखील यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.
सामाजिक व अध्यात्मिक कार्य करणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ भाविकांनी घेऊन त्यांचे मौलिक विचार ऐकावे असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.