
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून वीरांना नमन करण्यात आले. तसेच जागतिक आदिवासी दिन देखील साजरा करण्यात आला. तसेच मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देखील देण्यात आली. या उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना याप्रसंगी वाहतुकीचे नियम, हेल्मेट चा वापर, सुरक्षित प्रवास यासंबंधीची माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भूषण हिरे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीणचे सहा. पोलीस निरीक्षक मा.श्री. प्रवीण पाटील साहेब त्यांच्यासमवेत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक मा.श्री.स्वप्नील वाकळे साहेब आणि मा.श्री.शिवाजी विभूते साहेब, पोलीस कॉन्स्टेबल श्री. सगळे, श्री. निलेश आव्हाड, श्री.कीशोर गोसावी इ. उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण पाटील साहेब यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना महाराष्ट्रातील व देशातील रस्ते अपघाताची भयावह स्थिती स्पष्ट केली तसेच रस्ते अपघातातील जबाबदार घटकांची मीमांसा केली तसेच अपघात झाल्यानंतर करावयाच्या मदतीची पध्दत सांगताना नवीन कायद्यांचाही त्यांनी उल्लेख यावेळी केला. श्री.शिवाजी विभूते साहेब यांनी आपल्या संबोधनात सामान्य शिक्षणाबरोबरच लोकांनी वाहन शिक्षणावरही भर दिला पाहिजे महाविद्यालयांनी त्यासाठी जनजागृती केली पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.उज्वल शेलार यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हीरे यांनी तरुण पिढी व वाहने यांची सद्य परिस्थिती सांगतली त्याचबरोबर पालकांची जबाबदारी निश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच तरुणांनीही वाहन चालवताना जबाबदारीने चालवली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी विशाखा समितीच्या वतीने देखील विद्यार्थिनींना व त्यांच्या मातांना मार्गदर्शन करण्यात आले. या समितीच्या प्रमुख श्रीमती दीपाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माता पालक मेळाव्याचे देखील याप्रसंगी आयोजन करण्यात आले. या समितीच्या प्रमुख श्रीमती लता तडवी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर यांनी केले तर आभार श्री.देवेंद्र भांडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी त्यांच्या माता व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.