सहकार खात्याचे सहायक निबंधक एकनाथ पाटील यांना १५ हजारांची लाच घेतांना कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.
सिन्नर / प्रतिनिधी

येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांना आज दि. 2 दुपारी दीड वाजेच्या दरम्यान त्यांच्याच कार्यालयात 15 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पाथरे येथील एका पतसंस्थेच्या सेवकाने थकीत 17 कर्जदारांचे 101 चे वसुली दाखले मिळण्यासाठी पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते. पाटील यांनी प्रत्येक प्रस्तावाचे 2 हजार याप्रमाणे 34 हजारांची मागणी संबंधित सेवकाकडे केली होती. तडजोडीनंतर 25 हजार 500 रुपये देण्याचे संबंधित सेवकाने मान्य करीत 26 फेब्रुवारीला 10 हजार रुपये पाटील यांना दिले होते. दाखले तयार झाल्यानंतर उर्वरित 15 हजार 500 रुपये देत नसल्याने पाटील यांनी दाखल्यांवर सही करण्यास नकार दिल्यानंतर संबंधित सेवकाने बुधवारी (दि. 1) लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर बुधवारी दि.1 संबंधित सेवकाने पुन्हा पाटील यांची भेट घेऊन 1500 हजार 500 रुपये उद्या दि.2 देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार आज दि. 2 दुपारी सव्वा वाजेच्याच्या दरम्यान सरकारी पंचांच्या समोरच पाटील यांनी 15 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या रकमेसह पाटील यांना ताब्यात घेतले. आज सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची माघारीची अंतिम मुदत होती. पाटील हेच या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यामुळे कार्यालयात माघारीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती. या गर्दीतच ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर केबिनचा दरवाजा आतून बंद करून पाटील यांच्यासह त्यांच्या टेबल व बॅगची झडती घेण्यात आली. त्यानंतर पाटील यांना घेऊन लाचलुचपतचे अधिकारी सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहावर पोहोचले. तेथे पाटील यांच्यासह तक्रारदारांचे जबाब घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.