स्वा. सावरकर पुण्यतिथी निमित्त लासलगावी व्याख्यान संपन्न _ज्याने ज्याने रण गाजवले त्याला त्याला यश मिळाले : प्रा. हेमंत टिळे_
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव : कोणत्याही विषयाचे मूळ जाणून घेतले तर खरी वस्तुस्थिती लक्षात येते. सोशल मिडीयावर व्हायरल होणारा इतिहास चुकीचाही असु शकतो. तो वाचुन एखादा गट आक्रमक होतो. हे चुकीचे असुन विचारांचा प्रतिकार प्रक्षोभ न करता विचारांनीच करावा. इतिहासात ज्याने ज्याने रण गाजवले त्याला त्याला यश मिळाले. त्यासाठी विषयाच्या मूळापर्यंत जाऊन आपले विचार प्रगल्भ करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगीतले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यान समितीने श्री संत नामदेव महाराज मंदिरात आयोजित केलेल्या ‘रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले’ या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुजन करून झाली. स्वा. विनायक दामोदर सावरकरांनी लिहलेल्या ‘जयोस्तुते’ या प्रेरणादायी गीताचे गायन साधक कुलकर्णी, कादंबरी कुलकर्णी यांनी गायन केले तर सागर डचके यांनी तबल्यावर साथसंगत करून गीताचे सवाद्य सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे प्रा. हेमंत टिळे यांचा सत्कार स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी गौड साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक जाधव यांनी करतांना गेल्या आठ वर्षांपासून चालत आलेल्या व्याख्यानांचा आढावा सादर केला.
व्याख्यानात बोलतांना त्यांनी स्वा. अनंत लक्षण कान्हेरे याने केलेला जॅक्सनचा वध हि जगाच्या इतिहासात नोंदविली गेलेली घटना असल्याचे त्यांनी सांगीतले. नाशिक येथील दामोदर थिएटर येथे घडलेला चित्तथरारक प्रसंग त्यांनी श्रोत्यांसमोर रोमहर्षक पद्धतीने रंगवून सांगितला. त्या वधात वापरेले पिस्तूल हे स्वा. सावरकर यांनीच पुरवले असल्यामुळे सावरकरांचे नाव जॅक्सन वधात आले आणि त्यांनाही शिक्षा भोगावी लागली, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गौरव भोईटे यांनी केले तर आभार डाॅ. नीलेश दळवी यांनी मानले.
या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.