
माजी विद्यार्थिनींचाही १९ वर्षांखालील व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत अपर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक आयोजित शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या नाशिक विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा पोलीस अकादमी, नाशिक येथे दि. २ व ३ फेब्रुवारी दरम्यान पार पडल्या. त्यात मविप्र आश्रमशाळा मोहपाडा ता . सुरगाणा शाळेच्या विद्यार्थीनींनी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करत उत्कृष्ट कामगिरी केली. शाळेच्या व्हॉलीबॉल क्रीडाप्रकारात १७ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील मुलींच्या संघांने घवघवीत यश मिळवले आहे. संघातील निवडक विद्यार्थिनींना राज्यस्तरासाठी संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे शाळेतील माजी विद्यार्थिनींचा १९ वर्षांखालील व्हॉलीबॉल संघाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये आदिवासी विकास विभागातील नाशिक, कळवण ,धुळे,नंदुरबार,तळोदा,
यावल व राजूर या सात प्रकल्पांतर्गत २१३ शासकीय व २११ अनुदानित आश्रमशाळांतील २८३१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
मोहपाडा येथील मविप्र आश्रमशाळेच्या खेळाडूंसाठी क्रीडाशिक्षक कैलास चौधरी यांनी मेहनत घेतली. यशस्वी खेळाडूंचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवण प्रकल्पाधिकारी विशाल नरवडे, मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे तसेच पदाधिकारी ,कळवण-सुरगाणा तालुका संचालक रवींद्र देवरे,चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड ,मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे ,शालेय व्यवस्थापन समिती ,मुख्याध्यापक संतोष गौळी,दीपक कणसे-पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद यांनी अभिनंदन करून पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. *राज्यस्तरीय संघात निवड झालेल्या खेळाडू विद्यार्थिनी :-*
१) १४ वर्षांखालील व्हॉलीबॉल मुली – योगिता हरी बागुल , यमुना जयराम गवळी
२) १७ वर्षांखालील व्हॉलीबॉल मुली – हर्षाली बाळू चव्हाण, अंजली सुरेश गवळी .