मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या थेट विहिरीत जीव वाचवण्यासाठी मांजरीने घेतला बिबट्याचा शेपटीचा आधार

सिन्नर। वार्ताहर
तालुक्यातील टेंभूरवाडी येथे मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना आज (दि.14) पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर मांजरीने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला.
टेंभुरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्ष्यच्या शोधात असताना समोर दिसलेल्या मांजरीचा पाठलाग करण्यास बिबट्याने सुरुवात केली. पाठलाग करताना सांगळे यांच्या विहिरीचा अंदाज आल्याने मांजरीसह बिबट्या विहिरीत पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव वाचवण्यासाठी विद्युत मोटार ठेवण्यासाठी विहिरीत लावलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेतला. त्यानंतर मांजरीनेही जीव वाचवण्याची धडपड करत पाण्याच्या कडेला पोहोत जाऊन थेट बिबट्याच्या शेपटीलाच पकडत पाण्यावर तरंगून राहिली. सकाळी विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकताच सांगळे यांनी विहिरीत डोकावून बघितले असता बिबट्या व मांजर पाण्यात पडलेले त्यांना दिसून आले. यावेळी मांजर चक्क बिबट्याच्या शेपटीला धरून बसलेली त्यांना दिसून आली. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे सेवक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या व मांजरीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या सेवकांकडून अथक परिश्रम सुरू आहे. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली आहे.