ताज्या घडामोडी

नाशिक मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ, विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव

नाशिक प्रतिनिधी

 

 

नाशिक-आज संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पाला भाविक निरोप देत दहा दिवस लाडक्या गणपतीची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपती, सार्वजनिक मंडळाच्या गणपतींना आज मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.

नाशिक येथे पारंपारिक ढोल ताशाच्या गजरामध्ये विविध पारंपारिक नृत्य करत विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य सादर करण्यात आले. या शिवतांडव नृत्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले. या नृत्याचा अनोखा प्रयोग शिवसेना युवक मित्र मंडळ यांनी केला असून दरवर्षी शिवसेना युवक मित्र मंडळाकडून वेगवेगड्या आकर्षक नृत्याचा उपक्रम राबवला जातो. त्यामध्ये शंकरासह महाबली हनुमान यांच्या अनोख्या नृत्याचे सुद्धा सादरीकरण करण्यात आले. तसेच हरियाणाच्या कलाकारांनी केलेल्या या आघोरी नृत्यामुळे नाशिकचा विसर्जन मिरवणूक महामार्ग कमालीचा गजबजून गेला होता. यावेळी नाशिककरांनी हा नृत्य प्रकार बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य विसर्जन मिरवणुक सकाळी 11 वाजता सुरुवात करण्याचे पोलिसांचे नियोजन होते, परंतु नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीरा म्हणजे दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूकीला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. मिरवणुकीमध्ये मानाच्या मंडळासह 20 पेक्षा ही अधिक मंडळांनी सहभाग घेतला होता.

वाकडी बारव येथे पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, महानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ठाकरे गटाचे विनायक पांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गजानन शेलार, आदी नेते यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री भुसे यांनी स्वतः ढोल ताशाचा आनंद घेतला. उद्घाटनानंतर मिरवणूक हळूहळू पुढे सरकू लागली. प्रत्येक मंडळाला थांबण्याची काही ठिकाणे दिली होती, त्या त्या ठिकाणी मंडळाला वादनासाठी वेळ दिला होता. दादासाहेब फाळके मार्ग, महात्मा फुले मार्केट, दूध बाजार चौक, बादशाही लॉज कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा मेन रोड ,धुमाळ पॉईंट सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल ,अशोक स्तंभ, नवीन तांबट गल्ली ,रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड पंचवटी कारंजा मालवीय चौक, परशुराम पर्या मार्ग, कपालेश्वर मंदिर, भाजी बाजार, म्हसोबा पटांगण हा मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणूक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मिरवणूक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत गुलालवाडी व्यायाम शाळेच्या गणेश मंडळासमोर लेझीम पथकाने नेहमीप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अशाप्रकारे सार्वजनिक गणपती विसर्जनाची कुठला ही अनुचित प्रकार न घडता सांगता झाली.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.