लासलगाव महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन या निमित्ताने आदिवासी क्रांतिकारक थोर समाजसेवक बिरसा मुंडा आणि थोर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. रासेयो विभागातर्फे क्रांती दिनानिमित्त थोर स्वातंत्र्य सैनिक व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार आणि श्रीमती लता तडवी प्रमुख वक्ते होते. श्रीमती लता तडवी यांनी आपल्या मनोगतातून जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने पुढे आणण्याचे कार्य केले. जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे, आणि त्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्यांमध्ये आदिवासी लोकांचे योगदान ओळखणे हा आदिवासी दिन साजरा करण्यात पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे. तसेच श्री.उज्वल शेलार यांनी क्रांतीकारकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. त्यांनी क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्वातंत्र्य संग्रामात अनेक थोर पुरुषांनी, क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. 9 ऑगस्ट ची क्रांती खऱ्या अर्थाने जनतेचा उठाव होता. 9 ऑगस्ट 1942 च्या चळवळीत सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘९ ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या युवकांनी या इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि आपले उज्वल भविष्य घडवावे. असा संदेश दिला. यापुढेही आपल्याला हे कार्य अधिक जोमाने करावयाचे आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या युवक-युवतींनी राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंप्रेरणेने सामील होऊन आपल्या देशाच्या सेवेस, समाज कार्यास आणि प्रगतीस योगदान द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री.सुनिल गायकर, श्रीमती दीपाली कुलकर्णी, श्रीमती लता तडवी, श्रीमती अश्विनी पवार, श्रीमती जयश्री पाटील, श्री.प्रभाकर गांगुर्डे, श्री.रामसिंग वळवी, श्री.मोहन बागल, श्री.रामनाथ कदम, श्री.महेश होळकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.