रामायणाचार्य, वारकरी संप्रदायाचे वैभव ह.भ.प.गुरुवर्य मधुकर जी महाराज जाधव जोपूळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- ह.भ.प.मधुकर महाराजांचे हे वैकुंठ गमन करण्याचे वय मुळीच नव्हते.
परंतु, “जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला”
या उक्तीप्रमाणे महाराज वयाच्या 54 व्या वर्षी आपल्या सगळ्यांना सोडून वैकुंठवासी झाले.
त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय, संपूर्ण हिंदू समाज यांचे अतोनात नुकसान झाले आहे.मंगळवार दिनांक ३०/०७/२०२४ आषाढ वद्य दशमी ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे ०४:०० वाजता वयाच्या ५४ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.
समाजाला योग्य दिशा देणे, तरुणांना योग्य मार्गावर घेऊन जाणे,
परिसरातील सगळ्या संतांचं एकत्रिकरण करणे,
राष्ट्रासाठी आवश्यक असलेल्या विषयांमध्ये अग्रेसर होणे,आणि त्यातूनच समाज निर्मितीची व समाज संघटनाची एक मोठी कसरत गुरुवर्य ह.भ.प. मधुकरजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये केली.
मधुकर महाराजांची कार्यप्रवणता सगळ्यांनी जवळून अनुभवली आहे.
पाठीमागच्या चार वर्षांपूर्वी चांदवड तालुक्यामध्ये भव्य संत संमेलन घेण्यात आले होते. त्या संत संमेलनाची निरोपाची व्यवस्था आणि प्रत्यक्ष संत संमेलनाच्या ठिकाणी पंडाल व्यवस्था, भोजन व्यवस्था या सगळ्या बाबींमध्ये मधुकर महाराजांची उपस्थिती व त्यांचे मार्गदर्शन हे सगळ्या साधुसंतांसाठी अतिशय मोलाचे ठरले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय समाजावर वेळोवेळी होणारे अन्याय,अत्याचार, आक्रमण या सगळ्यांमधून हिंदू समाजाला तारण्याचं काम ज्यांनी कोणी केलं असेल त्यांना आपण राष्ट्रभक्त व संत असं म्हणतो… असेच हे संततुल्य, ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच मधुकर महाराज।।।
‘धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतो’,
असे आपण म्हणतो.
परंतु यासोबत जेव्हा जेव्हा धर्माची हानी होत असते तेव्हा तेव्हा धर्माला एका विशिष्ट कक्षेमध्ये घेऊन जाणे,
सज्जनशक्तीचे संरक्षण करणे, तरुण वर्गाला योग्य मार्ग दाखवणे हे कार्य करणे अतिशय महत्त्वाचे असते.
महाराजांच्या जाण्याने संपूर्ण समाजाला अतिशय दुःख झाले आहे.
हे दुःख पेलण्याची हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर संपूर्ण समाजाला आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाला निश्चितच देईल.