
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भगरे यांना माकपाचे दिड लाख मतांचे गिफ्ट
भाजपाच्या उमेदवार भारतीताई पवार यांची डोकेदुखी वाढली
आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यात माकप आघाडीत सहभागी असून, कोणत्याही जागेवर उमेदवार नसले तरी त्यांच्याकडून पाठिंबा मिळाला असल्याचे जाहीर करण्यात आले. दिंडोरी मतदारसंघातदेखील माजी आमदार गावित यांनी आज आपला प्रचार थांबवला.
सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. आता दिंडोरी मतदारसंघात माकप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्यासाठी संयुक्त प्रचार मोहीम राबवतील. त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला लाभदायी ठरला आहे, असे म्हणता येईल.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पेठ, सुरगाणा, कळवण यांसह दिंडोरी मतदारसंघात विविध आदिवासी भागात चांगला प्रभाव आहे. या पक्षाला लोकसभा निवडणुकीत सरासरी एक लाखाहून अधिक मते मिळतात. आता त्यांचा उमेदवार नसल्याने आणि भगरे यांना पाठिंबा मिळाल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना एक लाख मतांचे गिफ्ट मिळाले आहे, असे म्हणता येईल.