पवार , टोपेंनी जरांगेंना पुन्हा उपोषणाला बसविले. छगन भुजबळ यांचा दावा
नाशिक प्रतिनिधी

अतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत असताना त्यांना उठवायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली होती. या घटनेत सत्तर पोलीस जखमी झाले होते. त्यावेळी जरांगे पाटील तेथून निघून गेले होते, मात्र मध्यरात्री आमदार रोहित पवार व राजेश टोपे यांनी यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा उपोषणाला बसविले असल्याचा दावा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे राजकारण पुन्हा तापत असून, याबाबत शनिवारी माध्यम प्रतिनिधींनी छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की पोलिसांवर दगडफेक झाली असल्याची माहिती जर शरद पवार यांना माहीत असती तर ते तेथे गेलेच नसते. उद्धव ठाकरे देखील गेले नसते, जखमी पोलिसांवर उपचार झाल्याची रुग्णालयात नोंद आहे कुणाला शंका असेल तर त्यांनी तपासावी असा दावा ही छगन भुजबळ यांनी केला आहे. ह्या संपूर्ण घटनेमागे कुणाचा ब्रेन आहे हे चौकशीतून समोर येईल असे त्यांनी म्हटले.
भुजबळ पुढे म्हणाले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये इतकेच मी म्हणत होतो. मात्र जरांगे यांनी कधी मंडळ आयोग संपून टाकायची भाषा केली, तर कधी मंडळ आयोगाचा संदर्भात आरक्षण मागितले. यावरून ते किती अक्कल शून्य आहेत हे कळते अशी टीका भुजबळ यांनी यावेळी केली. उपोषणावर भुजबळ म्हणाले की त्यांची नाटके सुरूच असतात त्यामुळे आम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करतो.