श्रीक्षेत्र खेडलेझुंगे नगरीत श्रीरामायण भावकथेस भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ राम नामाच्या जयघोशात दुमदुमली खेडलेझुंगे नगरी
शरद लोहकरे,लासलगाव

वै.प.पु.योगिराज तुकाराम बाबा पुण्यतिथी सुवर्णमहोत्सव या कालावधीमध्ये श्रीक्षेत्र खेडलेझुंगे येथे ५ दिवस श्रीरामायण भावकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक २३ एप्रिल २०२३ ते २७ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये नक्षत्रवन, श्रीक्षेत्र खेडलेझुंगे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.दुपारी ठिक ४ वाजता स्मारक मंदिर येथून योगिराज तुकाराम बाबा पालखी व श्री रामायण ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. ग्राम प्रदक्षिणा करत नक्षत्र वनातील अभयवरदहस्त हनुमानासमोर आयोजित केलेल्या रामकथेच्या नियोजित ठिकाणी सांगता करण्यात आली .नक्षत्रवानामध्ये जवळपास एक एकरवर अत्याधुनिक मंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे.
सायंकाळी सात वाजता श्रीगुरु चंद्रशेखर महाराज देगुलकर यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले, यावेळी तुकाराम बाबा संस्थानाचे अध्यक्ष हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खेडलेकर यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. व पहिल्या दिवसाच्या रामकथेला सुरुवात झाली. सभा मंडपात राम कथेच्या श्रवणासाठी अथांग भाविक भक्तांचा जनसमुदाय जमलेला होता .श्री चंद्रशेखर एकनाथ महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. ते वेदान्ताचे तसेच श्रीमद्भगवतगीता, ब्रह्मसूत्रभाष्य, विवेकचूडामणी आणि महाभारतासोबत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, अशा श्रेष्ठ ग्रंथांचे अभ्यासक आहेत. ते एकनाथ महाराज देगलूरकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांची महती सर्वदुर आणि सर्वश्रृत असल्याने हजारो भाविकांची उपस्थिती लागणार आहे.
चौकट:-
कार्यक्रमाची रूपरेषा
दिनांक २३ एप्रील ते २७ एप्रिल या पाच दिवसांमध्ये दररोज सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा पारायण तर सायंकाळी ५ ते ९ या वेळेत श्रीरामायण भावकथेचे निरुपण होणार आहे. कथेला बाहेरगावाहुन येणाऱ्या भाविक-भक्तांसाठी निवासाची सुविधा आणि सकाळी चहा, नाश्ता, दुपारी महाभोजन आणि रात्री जेवणाची सुविधा वै.प.पु.योगिराज तुकाराम बाबा संस्थानतर्फे करण्यात आलेली आहे. तरी सदरच्या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन श्री.ह.भ.प.रघुनाथ महाराज खेडलेकर यांनी केले आहे.
चौकट:-
गोदावरीच्या पावन तटावर संतवन आणि नक्षत्रवणमध्ये हा भव्यदिव्य असा दैदिप्यमान कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे.
नक्षत्रवानामध्ये सुमारे १ एकरवर अत्याधुनिक मंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ज्ञानेश्वरी गाथा पारायणास ८०० भाविकांची उपस्थिती नोंदविली
नगर प्रदक्षिणा करताना मार्गावरील भव्य रांगोळी, महिलांच्या डोक्यावरील तुलसी कलश, भव्य भगव्या रंगाच्या उंच पताका ध्वज, व टाळकऱ्यांच्या मुखातून निघणारा हरिनामाचा गजर तसेच शाळकरी मुलांनी केलेले वारकरी वेशभूषा यामुळे संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध व आनंदित होऊन गेले होते