
भाटगांव- एस. टी. महामंडळाची पिंपळगाव बसवंत आगाराची बस क्रमांक MH 14 BT 3761 ही बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास वणी बस स्थानकावर फलाटावर लावलेली असताना चालक बाबाजी लक्ष्मण गवळी कंट्रोल कॅबीन मध्ये बसची नोंद करत असताना बसच्या इंजिन खालून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले, त्यांनी तात्काळ बस जवळ येऊन मेन स्विच बंद केला व लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान वाहक ज्योती नाडे यांनी बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून त्यांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. बसमधील फायर सेफ्टी सिलेंडर चालू न झाल्याने, चालक वाहक, तेथे उपस्थित असलेले तुषार शर्मा, वर्तमान पत्र विक्रेते सुनील महाले, वाहतूक नियंत्रक चौरे व उपस्थित प्रवाशांनी पाणी, वाळू आणि मातीचा वापर करून आग आटोक्यात आणली पण त्या दरम्यान बसचे ड्रायव्हर सिट व डेसबोर्ड जळून खाक झाले. या मध्ये कोणीही जखमी झाले नाही फक्त बस चे नुकसान झाले आहे. अशी माहिती चालक गवळी यांनी दिली.