
लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २९ ऑगस्ट हॉकी चे जादूगार म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. २९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारत देशात क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव महाविद्यालय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे क्रीडाप्रेमी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी स्व.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतीमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, क्रीडा संचालक डॉ.नारायण जाधव, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री.सत्तार शेख, प्रा.सुनील गायकर, प्रा.गणेश जाधव, प्रा.किशोर अंकुळणेकर, अक्षय आंबेकर, नैनेश लासुरकर, बाबा हारळे तसेच महाविद्यालयातील क्रिडा विभागाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी खेळाचे तसेच आरोग्याचे महत्त्व सांगताना खेळ खेळल्याने आरोग्य टिकते आणि खेळण्याचे फायदे सांगून विद्यार्थ्यांना फिट इंडिया ची प्रतिज्ञा देखील दिली. त्याचबरोबर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री.सत्तार शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे महान खेळाडू म्हणून आपण ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. क्रीडा संचालक डॉ.नारायण जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयातील शिकत असलेल्या खेळाडूंसाठी कुस्ती, टेबल टेनिस ,फुटबॉल तसेच विविध मैदानी क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येत आहे तसेच विजेत्या संघाला २९ ऑगस्ट स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे सांगितले. याप्रसंगी क्रीडाप्रेमी विद्यार्थी खेळाडूंनी अत्यंत उत्साहात आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश जाधव यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार देखील मानले. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.नारायण जाधव व प्रा.गणेश जाधव यांनी केले.