श्री सप्तशृंगी मातेचे ऐच्छिक प्रकारात सशुल्क व्ही आय पी दर्शन सुविधा दि. १३/०४/२०२३ पासून कार्यान्वित…!
मुख्य संपादक राहुल वैराळ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगगड हे नाशिक पासून ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेत डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर असून, या ठिकाणी वर्षभरात सुमारे ४० ते ४५ लाख भाविक श्री भगवतीच्या दर्शनासाठी येत असतात.
विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधा अंतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात निवास व्यवस्था तसेच ना नफा ना तोटा या तत्वावर रु. २०/- या अल्प दरात प्रसादालय भोजन व्यवस्था कार्यान्वित केली असून, विश्वस्त मंडळा मार्फत नव्यानेच श्री भगवती मंदिर जिर्णोद्धाराचे काम व श्री भगवती मंदिर गाभारा चांदीचे नक्षीकांत काम हाती घेण्यात आले असून श्री भगवती मंदिर सभामंडपाच्या प्रकल्पाच्या पुर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात देणगी व निधी आवश्यक आहे. तसेच श्री भगवती मंदिर गाभारा चांदीचे नक्षीकांत कामासाठी मोठ्या प्रमाणात चांदी अपेक्षित असून त्यात भाविक स्वईच्छेने योगदान देत आहेत. वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण होणेकामी मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती रु. १००/- प्रमाणे श्री सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा गुरूवार, दि. १३/०४/२०२३ पासून कार्यान्वित करण्यात आली असून सदरची सुविधा ही भाविकांसाठी संपूर्णतः ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे तशी उपलब्ध असेल. ऐच्छिक सशुल्क व्ही आय पी दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या वय वर्ष १० वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना सदरचा पास मात्र निशुल्क असेल. सदर सशुल्क व्ही आप पी दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी ९.०० ते ६.०० वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध होणार असून सशुल्क व्ही आय पी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद श्री दर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती विश्वस्त संस्थे मार्फत वृत्तपत्र माध्यमांना देण्यात येत आहे .