सावरगाव साठवण तलावाच्या कामाची छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी तांत्रिक अडचणी दूर करत सावरगाव साठवण तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे – छगन भुजबळ

लासलगाव,दि.१७ फेब्रुवारी :- खडक माळेगाव परिसरातील सिंचनासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या सावरगाव साठवण तलावाच्या कामातील तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना दिल्या.
छगन भुजबळ यांनी आज सावरगाव साठवण तलाव व बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना कामाबाबत सूचना केल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, सरपंच दत्तात्रय रायते, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, हरिश्चंद्र भवर, विजय सदाफळ,
प्रादेशिक जलसंधारण अधिकारी राजेंद्र काळे, उपविभागीय अधिकारी नारायण डावरे, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळस, कंत्राटदार योगेश पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, बंधारा परिसरातील मातीकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे. कामासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी सोडवून बंधाऱ्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच त्यासाठी शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा अशा सूचना त्यांनी केल्या.
सावरगाव साठवण तलावाच्या सांडव्याचे कामे पूर्ण झाले असून कामामध्ये वाढ होणार असल्याने सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. जलरोधक खंदकाचे काम पूर्ण झाले असून माती टाकण्याचे काम सुरू करण्यात करण्यात येत आहे. या साठवण बंधाऱ्याची क्षमता ८२.९७ दशलक्ष घनफूट असून याची सिंचन क्षमता २४८ हेक्टर इतकी आहे. सुमारे १२ कोटी रुपये खर्चातून हे काम करण्यात येत आहे. या साठवण तलावामध्ये परिसरातील सिंचन क्षमता अधिक वाढून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.