संत बाळूमामाच्या मेंढ्यांना अपघात, अज्ञात वाहनाने मेंढ्या चिरडल्या…

सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे स्विफ्ट कारच्या धडकेत आठ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.
कोल्हापूर येथील संत बाळुमामा यांचे संस्थानचा २५० मेंढ्याचा कळप व पालखी क्र. १३ मिरगाव येथे आलेला होता. मिरगाव येथून मेंढ्या व पालखी रथाची पंचाळे ग्रामस्थ मिरवणुक काढून आणत होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास शहा-पंचाळे रोडवर सुर्यभानजी गडाख विद्यालय परिसरात अज्ञात वाहनाने मेंढ्यांचे कळपाला धडक दिली. या धडकेत ८ मेंढ्या मृत्युमुखी तर ८ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहे.
सदर घटनेचा तलाठी संतोष बलकांडे, सरपंच उषा थोरात यांनी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश डबे, प्रविण शिंदे यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. यावेळी पोलीस पाटील शांताराम कोकाटे यांनी या अपघाताची मुसळगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार जयंत जगताप करत आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच भाविकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अज्ञात वाहन चालकाचा ताबडतोब शोध घेतला जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर भाविक नरमले. मृत मेंढ्यावर स्थानिकांच्या मदतीने विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.