बुलढाण्यात शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठी चार्जर विकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न; आंदोलन चिघळले

बुलढाणा, दि. ११ (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना पोलिसांनी बळाचा वापर करत लाठी चार्ज केल्याची घटना बुलढाण्यात ११ फेब्रुवारी रोजी घडली. काही वृद्ध शेतकरी, महिला यांनाही पोलिसांच्या लाठ्यांचा मार बसल्याने आंदोलक संतप्त झाल्याने आंदोलन चिघळले आहे. रविकांत तुपकरांनी पोलीस ठाण्यातच अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीनेही पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध करत जिल्हाभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांना पात्र असतानाही अद्याप पिकविम्याची रक्कम मिळाली नाही, अतिवृष्टीची १७४ कोटी रुपयांची मदत मिळालेली आहे परंतु महसूल आणि कृषी विभागाच्या दिरंगाईने गेल्या तीन महिन्यांपासून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि सोयाबीन-कापूस दरवाढ या प्रमुख प्रश्नांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. गेल्या तीन दिवसांपासून ते भूमिगत होते. ११ फेब्रुवारीच्या सकाळपासून शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तुपकरांच्या कार्यालयासमोर जमण्यास सुरुवात केली होती. १२ वाजता तुपकर यांच्या कार्यालयावरुन शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजीक तुपकर पोलिसांच्या नजरा चुकवून खाकी गणवेशात या मोर्चात सहभागी झाले आणि अंगावर डिझेल ओतून त्यांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर तुपकरांसह सर्व शेतकरी, कार्यकर्ते, महिलांनी ठाण मांडले. दोन तास शांततेच्या मार्गाने त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु होते. प्रशानाकडून सक्षम अधिकाऱ्याने चर्चा करावी, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान पोलिसांनी अटक करण्याची तयारी केली आणि अचानक लाठी चार्ज सुरु केल्याने एकच पळापळ झाली. यावेळी वयोवृद्ध शेतकरी, महिलांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी तुपकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना जबरीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. आंदोलन शांततेने सुरु असताना पोलिसांनी हेतुपुरस्करपणे आंदोलन चिघळविण्यासाठी वृद्ध शेतकरी, महिलांवर लाठीमार केल्याचा आरोप तुपकरांनी केला असून पोलीस ठाण्यातच अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आदींनी भ्रमणध्वनीवरुन तुपकरांशी चर्चा करुन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. दरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत त्यामुळे सदरचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सायंकाळी उशीरापर्यत रविकांत तुपकर व त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते, महिला पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडून होते.