के . के. वाघ शैक्षणिक संकुल रानवड येथे काका-तात्या या थोर गुरु शिष्यांना अभिवादन
प्रतिनिधी. श्री.ज्ञानेश्वर भवर

के. के. वाघ शैक्षणिक संकुल रानवड येथे पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते व दानशूर काकूशेठ उदेशी यांचा संयुक्त पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात आला. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. विश्वासराव मोरे (उपाध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक) तसेच माजी प्राचार्य श्री रवींद्रजी मोरे, कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे नातू के. के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक, माननीय श्री अजिंक्य बाळासाहेब वाघ उपस्थित होते.
काकासाहेब वाघ यांच्या रानवड येथील राहता वाडा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर रानवड साखर कारखाना परिसरातील काकासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर काकासाहेबनगर शैक्षणिक संकुल येथे कर्मवीर काकासाहेब वाघ, तात्यासाहेब बोरस्ते, काकूशेठ उदेशी व गीताई वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी विश्वासरावजी मोरे यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर काकासाहेब वाघ, तात्यासाहेब बोरस्ते, काकूशेठ उदेशी यांच्या कार्याचा आढावा देत कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी शेतकरी आणि बहुजन समाजासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली. काकासाहेबांची ओळख करून देताना मराठा विद्याप्रसारक संस्थेचे आधारस्तंभ, निफाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व रानवड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार, स्वातंत्र्य योद्धे, धुरंधर राजकारणी, सहकार- कृषी – जलसिंचन क्षेत्रातील कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षित गोर गरीबांचे कैवारी अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याचे नमूद केले. तसेच रविंद्रजी मोरे यांनी आपल्या मनोगतातून पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा शिक्षण क्षेत्रातील वारसा दिवंगत अध्यक्ष कर्मधुरंधर कै. बाळासाहेब देवराम वाघ उर्फ भाऊ यांच्यानंतर विद्यमान अध्यक्ष इंजी. श्री. समीर वाघ व श्री. अजिंक्य वाघ हे समर्थपणे पार पाडत असल्याचे नमूद केले.
अध्यक्षस्थानी बोलतांना मा. अजिंक्य दादा वाघ यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षणरूपी ज्ञान यज्ञात आपल्या आयुष्याची समिधा ओतनाऱ्या, परिस्थितीला न डगमगता स्वाभिमानी व बंडखोर प्रवृत्तीने अंधश्रध्देच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला दिशा देणाऱ्या कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रम प्रसंगी यावेळी श्री. रामनाथ आण्णा पानगव्हाणे, श्री. जयवंतराव वाघ, श्री. अशोक आहेर, श्री. नेताजी वाघ, श्री. रघुनाथ कोल्हे, श्री. रमाकांत जाधव, श्री. प्रमोद वाघ, श्री. तेजन्द्र वाघ, श्री. सुनील वाघ, स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शरद कदम, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव, रानवड परिसर विकास प्रतिष्ठानचे श्री. छञपती विद्यालय व काकासाहेबनगर शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार यशवंत पवार यांनी मानले.